Sunday, 19 November 2017

अष्टदिवाळी

कोण्या अनामिक कवीच्या पहिल्या तीन कडव्यांवरून सुचलेली अजून पाच कडवी!

ऊन सावल्या येतील जातील
कोंब जपावे आतील हिरवे
चला दिवाळी आली आहे
ओंजळीत घ्या *चार दिवे*||

*पहिला* लावा थेट मनातच
तरीच राहील *दूसरा* तेवत
घरात आणि प्रियजनांच्या
आयुष्यावर प्रकाश बरसत ||

*तिसरा* असू दे इथे अंगणी
उजेड आल्या गेल्यानाही
*चौथा* ठेवा अशा ठिकाणी
जिथे *दिवाळी माहित नाही* ||

वरील ढकललेल्या कवितेवर माझ्या काही ओळी...

दिवा पाचवा तिथेही लावा
जिथे ठेविला देह कुणितरी
ज्योत विझवुनी स्वप्राणाची
तेवत राही अमर भूवरी ।।

दिवा सहावा असा असावा
जिथे पतंगा मिळे विसावा
भित्या जिवा आधार असावा
ऊबही थोडी सरे गारवा ।।

सप्तऋषी ते सात दिव्यांचे
मार्गदर्शनी महत्त्व त्यांचे
अढळपदावरी एका बसवुनी
नवध्रुवशोधा भ्रमण तयांचे ।।

दिवा आठवा प्रभुभक्तीचा
सतत तुम्हा नतमस्तक ठेवो
अष्टदिपांची दीपावली ही
सुखसमृद्धी सर्वांना देवो।।

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 4 October 2017

साधना!

गाणे माझे चढे पायर्‍या
पेटीवरती सुरेल स्वार्‍या
निर्मित मनमोदना
कळे का कुणा माझि साधना?

गाडीमध्ये कुणी भिकारी
वाजवि पेटी, गातो गाणी
सोडवी दिनवंचना
कळे का कुणा त्याचि साधना?

असो कोकिळा, काकही किंवा
कष्ट उपसती जीव जगविण्या
असे शुद्ध भावना
कळूद्या तुम्हा खरी साधना !

अनिरुद्ध रास्ते

Thursday, 27 July 2017

कृष्णबिंब

मनात वाकुन बघता मजला
दिसला बिंबित कान्हा ।
मलाच नकळत फुटला हृदयी
अपार प्रेमळ पान्हा ।।

पसरे अंतरी समाधान अन्
दुःखही सकल निमाले ।
श्यामकांतिची नीलमरंगत
पाहुन श्रमही पळाले ।।

गाई चरती गवत कोरडे
जणु विवेक षड्रिपु मारी ।
वरी निर्मिती दूध तयासम
सद्वृत्ती मनी पसरी ।।

संध्यासमयी सूर्य विसावे
केशर नभि या फुलवे ।
नील-केशरी विरोध साधुन
कृष्णरूप अति खुलवे ।।

आसमंत तो मनपटलाचा
'मीपण' राधा भावे ।
परमात्मा परि कृष्णरूपि हा
अहंगंड विरघळवे ।।
- अनिरुद्ध रास्ते

Monday, 24 July 2017

कविता: जरा हटके!


अशी दिसावी कविता सुंदर
मूर्तीमंत ती जणु अप्सरा ।
दोष नसावा कुठेच इतुका
कुठे नसावा किंचित नखरा।।

अशी दिसावी कविता सुंदर
रोज एकटी गच्चीवरती ।
वेळ अशीही जुळून यावी
कुणी नसावे अवतीभवती ।।

अशी दिसावी कविता सुंदर
मरुभूमीतिल निर्झर झुळझुळ ।
आसुसलेल्या नेत्रद्वयांची
सुसह्य करते थोडी तळमळ ।।

अशी दिसावी कविता सुंदर
सूर समेला जोडुन यावे ।
चुकार नजरेमधुनी बघता
हळुच तिनेही होय म्हणावे!!

- अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 19 April 2017

काही नवे सामाजिकसंवाद रोग


ढकलसंसर्ग: हा एक संसर्गजन्य रोग आहे. याचे लक्षण एका गटावरील संदेश इतर अनेक किंवा सर्व गटांवर ढकलणे. उपाय स्वतःवर नियंत्रण.

संदेशबद्धकोष्ठ: म्हणजे बराच वेळ लिहीत बसणे पण संदेश न टाकणे. इतरांना याचे लक्षण 'अमुक अमुक टायपिंग...' असे दिसते. उपाय: छोट्या वाक्यात संदेश पाठवणे अथवा दुसरीकडे मोठा संदेश लिहून मग गंतव्य ठिकाणी छापणे!

संदेशमेद: म्हणजे आतापर्यंत आलेले सर्व संदेश काढून न टाकता साठवून ठेवणे. याने मोबाईल साठवण क्षमतेवर ताण पडतो. उपाय: नियमितपणे संदेश काढून टाकून साफसफाई करणे.

ढकलवातमुक्ती: याचे लक्षण म्हणजे एकाला पाठवण्यासाठीचा संदेश गटावर सर्वांना समजेल असा पाठवणे. उपाय: इतरांनीच नाक धरून बसणे सोयीचे पडते!

ढकलातिसार: लक्षण: गटावर किती संदेश पाठवतो, कुणाला त्याची खरेच गरज आहे का? आपली आणि इतरांची बॅंडविड्थ किती खर्च होते याचा विचार न करता वाटेल तेवढे संदेश पाठवित राहणे! उपाय: हाही परत इतरांनाच करावा लागतो. गपगुमान नकोसे संदेश काढून टाकणे अथवा ऑटोडाऊनलोड बंद करणे.

ढकल्याखुरकूत: प्रत्येक संदेशाला जीभ काढलेली, डोळे मारलेली भावचिन्हे पाठवणे. उपाय: काहीच नाही

स्वपरिचयगंड: लक्षण: स्वतःचे सार्वजनिक व्यक्तिविवरण नीट न भरणे. मुळातच डीपी हा इतरांना आपण कोण आहोत हे कळावे परंतु संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये अशासाठी असतो. तोही नीट भरला नसेल तर स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंड आहे किंवा दुसर्‍याबद्दल पुरेसा आदर अथवा विश्वास नाही असा अर्थ होतो. उपाय: स्वतःचे व्यक्तिविवरण, किमान नाव तरी भरलेले असावे.

ढकलविस्मरण: लक्षण: आधी पाठवलेलाच संदेश परत पाठवणे. स्वतःचाच संदेश परत पाठवणे, एका गटावर मिळालेला संदेश सर्व गटांवर पाठवण्याच्या नादात मूळ गटावरच पाठवणे, आणि योगायोगाने दोघांनी एकच संदेश एकाच गटावर पाठवणे असे याचे उपप्रकार आहेत. उपाय: झोप, गप्पा किंवा कुचाळक्या करतेवेळी जसे एकाग्रचित्त व काळजीपूर्वक लक्ष असते तसेच गटावरील संदेश वाचताना आवश्यक आहे.

सततप्रत्युत्तरप्रकोप: लक्षण: प्रत्येक संदेशाला प्रतिक्रिया  दिलीच पाहिजे अशा समजुतीने प्रत्युत्तरे देणे. यामुळे एकदोघेच बोलत राहून बाकीचे सदस्य गप्प बसून राहण्याचा धोका उद्भवतो. उपाय: दिवसातून जास्तीतजास्त ४-५च प्रत्युत्तरे द्यायची असा नियम स्वतःसाठी करावा.

विशालसंदेशप्रक्षेपण: लक्षण: अति मोठे संदेश ढकलणे. यामुळे बरेच लोक संदेश न वाचताच सोडून देतात. आणि नंतर पुनःक्षेपणाची शिकार होतात. उपायः स्वनियमन!

आत्मावमानगंड: लक्षण: गटावर आपला अपमान झाला किंवा होतो आहे अशा  कल्पनेने संवादात भाग न घेणे आणि कुढत राहणे. अशाने आपणच विस्मरणात जाण्याचा धोका असतो. उपाय: संवादयज्ञ सतत चालू ठेवा. आपल्या विचारांना वाट द्या.

अंतिममताग्रह: लक्षण: शेवटचे मत माझेच हवे या हेकटपणाने संवाद वाढवत (की चिघळवत?) नेणे. याने लेखकाविषयीचे इतरांचे मत खराब होण्याचा धोका असतो. उपाय: थोडे सोडून द्या!

अक्षर-चिन्हखिचडी: लक्षण: अक्षरांत भावचिन्हे आहेत की भावचिन्हात अक्षरे आहेत असा संभ्रम होईल असे लेखन. याने लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळणे अवघड होते.  लेखकाच्या लेखनक्षमतेबद्दलही शंका निर्माण होते.

तर असे हे काही सामाजिकसंवादरोग. सामाजिकसंवादवैद्यक शाखेची निर्मिती व घोडदौड आपल्यामुळेच पुढे चालू आहे. अजून काही नवीन रोग निदर्शनास आल्यास पुन्हा लिहूच!

- अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 8 March 2017

होय मीच!

अनादिच्याही आधीची आदिशक्ती मीच!
विद्या आणि संपत्तीची देवताही मीच!

सहा पोरं मरताना पाहूनही आठव्या कृष्णाला जन्म देणारी मीच
आणि वनात सोडूनही तुझ्या कुळाला वाढवणारी मीच!

त्रिदेवांची इच्छा ऐकून त्यांना बाळ करणारी मीच!
आणि सात मुलं गंगेत सोडून आठवं अडवलं म्हणून सोडून जाणारी मीच!

नवर्‍याबरोबर वनात येणारी मीच
आणि नवरा वनात गेल्यानंतर चौदा वर्षं एकटी काढणारी मीच!

आकाशातून पडल्यावर तुला सहन न होणारी मीच!
आणि तुझ्या शंभर पितरांना मुक्ती देणारी मीच!

नवर्‍याला युद्धात मदत करणारी मीच
आणि नवर्‍याचा अपमान झाला म्हणून यज्ञवेदीवर सती जाणारी मीच!

अब्रू वाचावी म्हणून जोहार करणारी मीच
आणि मूल पाठीशी बांधून मरेतो लढणारी मीच!

नवर्‍याचे प्राण परत आणणारी मीच,
आणि नवर्‍याच्या आज्ञेनी विकली जाणारी मीच!

पुरुषी वासनेला बळी जाणारी मीच
आणि नवा जीव निर्माण करण्याची अतुल्य क्षमता असणारी

फक्त मीच!!!

-अनिरुद्ध रास्ते

Friday, 24 February 2017

शिशिरतरुंच्या शाखांमधुनी

शिशिरतरुंच्या शाखांमधुनी
सूर्यशलाका ओघळते
शांत धुक्यातुनी प्रवास करता
थंडी शोषुन गारठते

बिंदु हिमाचे बसती भूवरि
शिवसांबापरी सुस्थिर ते
चमचमती ते हिर्‍यांपरी कां
प्रकाशगंगा शिरी पडते!

वर्ख भुरभुरा लेउन लपती
तृणपाती किती नाजुक ती
विरघळता कण सूर्यकराने
खुलून हसती गोड अति!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 7 January 2017

नको होउदे नश्वर एकच!


वाटते सगळे विश्वची झोपले
बर्फात गाडून कायम थिजले
दिसते सगळे काळे वा पांढरे
शिशिर ऋतूने गारूड घातले

असेल मनाचा आठव कोपरा
रंगही त्याच्यात दडून बसले
आण तो कोपरा मनाच्या मध्यात
दिसेल लगेच जगही रंगीले

अशीच असते प्रचंड किमया
मानवमनच्या सुप्तशक्तिची
नसता काहिच दृष्टिसमोरी
क्षणात करते विश्वनिर्मिती

शिशिरामधुनी हेमंताच्या
आठवणी ते पाहू शके
येतील सुद्धा विषय वसंती
करिता थोडे यत्न अथके

नश्वर सगळे जगात इथल्या
शिशिर त्यातुनी ना सुटला
नको होउ दे नश्वर एकच
निर्मितीचा वर मज दिधला!

-अनिरुद्ध रास्ते