ढकलसंसर्ग: हा एक संसर्गजन्य रोग आहे. याचे लक्षण एका गटावरील संदेश इतर अनेक किंवा सर्व गटांवर ढकलणे. उपाय स्वतःवर नियंत्रण.
संदेशबद्धकोष्ठ: म्हणजे बराच वेळ लिहीत बसणे पण संदेश न टाकणे. इतरांना याचे लक्षण 'अमुक अमुक टायपिंग...' असे दिसते. उपाय: छोट्या वाक्यात संदेश पाठवणे अथवा दुसरीकडे मोठा संदेश लिहून मग गंतव्य ठिकाणी छापणे!
संदेशमेद: म्हणजे आतापर्यंत आलेले सर्व संदेश काढून न टाकता साठवून ठेवणे. याने मोबाईल साठवण क्षमतेवर ताण पडतो. उपाय: नियमितपणे संदेश काढून टाकून साफसफाई करणे.
ढकलवातमुक्ती: याचे लक्षण म्हणजे एकाला पाठवण्यासाठीचा संदेश गटावर सर्वांना समजेल असा पाठवणे. उपाय: इतरांनीच नाक धरून बसणे सोयीचे पडते!
ढकलातिसार: लक्षण: गटावर किती संदेश पाठवतो, कुणाला त्याची खरेच गरज आहे का? आपली आणि इतरांची बॅंडविड्थ किती खर्च होते याचा विचार न करता वाटेल तेवढे संदेश पाठवित राहणे! उपाय: हाही परत इतरांनाच करावा लागतो. गपगुमान नकोसे संदेश काढून टाकणे अथवा ऑटोडाऊनलोड बंद करणे.
ढकल्याखुरकूत: प्रत्येक संदेशाला जीभ काढलेली, डोळे मारलेली भावचिन्हे पाठवणे. उपाय: काहीच नाही
स्वपरिचयगंड: लक्षण: स्वतःचे सार्वजनिक व्यक्तिविवरण नीट न भरणे. मुळातच डीपी हा इतरांना आपण कोण आहोत हे कळावे परंतु संवेदनशील माहिती बाहेर जाऊ नये अशासाठी असतो. तोही नीट भरला नसेल तर स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंड आहे किंवा दुसर्याबद्दल पुरेसा आदर अथवा विश्वास नाही असा अर्थ होतो. उपाय: स्वतःचे व्यक्तिविवरण, किमान नाव तरी भरलेले असावे.
ढकलविस्मरण: लक्षण: आधी पाठवलेलाच संदेश परत पाठवणे. स्वतःचाच संदेश परत पाठवणे, एका गटावर मिळालेला संदेश सर्व गटांवर पाठवण्याच्या नादात मूळ गटावरच पाठवणे, आणि योगायोगाने दोघांनी एकच संदेश एकाच गटावर पाठवणे असे याचे उपप्रकार आहेत. उपाय: झोप, गप्पा किंवा कुचाळक्या करतेवेळी जसे एकाग्रचित्त व काळजीपूर्वक लक्ष असते तसेच गटावरील संदेश वाचताना आवश्यक आहे.
सततप्रत्युत्तरप्रकोप: लक्षण: प्रत्येक संदेशाला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे अशा समजुतीने प्रत्युत्तरे देणे. यामुळे एकदोघेच बोलत राहून बाकीचे सदस्य गप्प बसून राहण्याचा धोका उद्भवतो. उपाय: दिवसातून जास्तीतजास्त ४-५च प्रत्युत्तरे द्यायची असा नियम स्वतःसाठी करावा.
विशालसंदेशप्रक्षेपण: लक्षण: अति मोठे संदेश ढकलणे. यामुळे बरेच लोक संदेश न वाचताच सोडून देतात. आणि नंतर पुनःक्षेपणाची शिकार होतात. उपायः स्वनियमन!
आत्मावमानगंड: लक्षण: गटावर आपला अपमान झाला किंवा होतो आहे अशा कल्पनेने संवादात भाग न घेणे आणि कुढत राहणे. अशाने आपणच विस्मरणात जाण्याचा धोका असतो. उपाय: संवादयज्ञ सतत चालू ठेवा. आपल्या विचारांना वाट द्या.
अंतिममताग्रह: लक्षण: शेवटचे मत माझेच हवे या हेकटपणाने संवाद वाढवत (की चिघळवत?) नेणे. याने लेखकाविषयीचे इतरांचे मत खराब होण्याचा धोका असतो. उपाय: थोडे सोडून द्या!
अक्षर-चिन्हखिचडी: लक्षण: अक्षरांत भावचिन्हे आहेत की भावचिन्हात अक्षरे आहेत असा संभ्रम होईल असे लेखन. याने लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळणे अवघड होते. लेखकाच्या लेखनक्षमतेबद्दलही शंका निर्माण होते.
तर असे हे काही सामाजिकसंवादरोग. सामाजिकसंवादवैद्यक शाखेची निर्मिती व घोडदौड आपल्यामुळेच पुढे चालू आहे. अजून काही नवीन रोग निदर्शनास आल्यास पुन्हा लिहूच!
- अनिरुद्ध रास्ते