Monday, 13 April 2020

वसंतगीत

वसंत फुलला वनावनातुन
रंग प्रकृती खेळतसे
विविध फुलांतुन ओसंडुन ये
ऋतुराजाचे प्रेम असे।

पीतरंग हा रंगराज जणु
उत्सव त्याचा आज असे
फुल्ल धुमारे सांगत येती
राजाचे प्रतिहारी जसे।

अंश सांडला चंडांशुचा
झेलुन धरिती तरू शिरी
चालुन दमला रवी नभातच
घाम टपकला धरेवरी।

घोस फुलांचे बहरुन येती
उधळत पराग सगळिकडे
नवनवरीला हळद लागली
पिवळे कर तळहात गडे।

जेजुरगडचा खंडेराया
उत्साहाने जणु डोले
पहा वाटला प्रसाद त्याचा
येळकोटचे चांगभले।

वसंत उत्सव इथे मांडला
उत्साहे गाऊ गीत
पीतरंग हा सांगत आला
अमर तुझीमाझी प्रीत!

- अनिरुद्ध रास्ते

Thursday, 9 April 2020

कोंकण जगणे!

वाट आळशी दगडांमधली
माड गाळती अवखळ किरणे
गाज ऐकु ये चित्रामधुनी
ऐसे सुंदर कोकण जगणे!

या भूवर अपरांत जन्मला
भार्गवरामाच्या कृपेने,
पाचूं जडवुन पदरावरती
धरा नेसली हिरवी वसने!

सागरलाटा अखंड करिती
दंगामस्ती अतिनेमाने
कोकणभूच्या अंगावरती
सतत कोरती नाजुक लेणे

सह्यकड्यांची बघून छाती
जलद बरसती पुर्‍या दमाने,
अंगावरती घेऊन त्यांना
माड उरकती सचैल स्नाने!

यांवा कोंकण आंपलेंच हों
म्हणती किती जन आनंदाने
हिशेब करिती कणाकणाचा
लख्ख विजेच्या तत्परतेने!

गणरायावर अपार भक्ती
आंबे, काजू येथे पिकती
सागरात वा रानामध्ये
कुठेच खाणे नाही उणे!

वर्षामधुनी एकदातरी
धूळ येथली पायी लावणे
हृदयामध्ये भरून घेणे
ऐसे सुंदर कोंकण जगणे!!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 8 April 2020

पुळणीचे प्रेमगीत

तो येउन भेटुन गेला
मज चिंब भिजवुन गेला।
खुणा प्रणयक्रीडांच्या
मजवरी सोडुनी गेला।।

मी स्तंभित इथेच पडुनी
कुणी तुडवी मज पायांनी।
भाजतो सूर्य किरणांनी
मन झुरे वाट पाहूनी।।

लाटांवर होऊनी स्वार
तो नक्की पुन्हा येईल
घेउन जाईल मजला
आणून पुन्हा सोडेल!

हे अखंड चालायाचे
चक्र विरह-मिलनाचे।
कण कण भिजवायाचे
कण कण झिजवायाचे।।

- अनिरुद्ध रास्ते