Thursday 28 October 2021

समुद्राचे स्वगत!

मी आतुर करण्या स्वतःवर कुरघोडी
भेटण्या किनार्‍या, नसे तमा मज थोडी
कधी वाळूवर पसरून घालवी शक्ती
कधी दगडांवर धडकून डोके फोडी
काय मिळे मज करून अट्टाहास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

हेलावी मजला सतत पुढे अन मागे
उचंबळवे कधी, फणा काढण्या लावे
समजत नाही कसे आवरू मजला
अहंकार हा अजून नाही सुटला
कोण घडवितो असला जीवनप्रवास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

गुरुत्व जसे बाहेरिल खेळवी मजला,
बांधून तसेही ठेवी, कुणी आतुनी मजला
दिसलो जरि का उच्छृंखल बाहेरी
खोलात अनोखी सजली दुनिया भारी
कसे निर्मिले उदरी या विश्वास
कळले, बल हे अंतरातले खास!

सांगतो तुम्हाला, गुपित मला जे कळले
सांगावे वाटे, जरी कुणी मला ना पुसले
घेतला तुम्ही जर ध्यास आत्मज्ञानाचा
आणिक केला प्रयास अखंड साचा
जरी बाह्यप्रभावे, डळमळला विश्वास
बल अंतरातले सक्षम बनवी स्वतःस!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday 23 October 2021

हिमालय!

स्तब्ध उभा तो तिथे दूरवरी
हिमालयाचा उंच कडा।
भीष्मपित्यासम आधारासह
कणखरतेचा देई धडा।

प्रचंड भिंती, खोल कपारी
सोंडा अन् ताशीव कडे।
बर्फातुनही डोके काढती
अदम्य टोकाची शिखरे।

जनक असा हा शतकन्यांचा
सागरास त्यां दान करी।
पुण्य महत्तम मिळवून सारे
बिंदु सगर्व सर्वोच्च धरी।

एक जावया शांत ठेवण्या
दिला राहण्या कैलास।
जावई दुसरा पूर्वपश्चिमी
पाय धुवुनी तोषवी त्यास।

असा हिमालय पर्वतराजा
मुकुट पृथ्वीचा मज भासे।
विश्वरूप ते अजस्त्र पाहुन
नकळत होइ नतमस्तकसे!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday 20 October 2021

निर्झर

खळखळ वाहत निर्झर धावे
हिरव्या घनवनराजीमधुनी
जिना उतरते अल्लड कन्या
पायांमध्ये पैंजण घालुनी!

जणु घातला शुभ्र झगा अन्
नक्षी काढली तुषार गुंफुनी
जलबिंदूंची माळ गळा अन्
घुंघट धरला जलधारांनी।

दाखवि सुंदर पदलालित्य
उसळत अवखळ दगडांमधुनी
जणु नाचते नृत्य अप्सरा
अवतरली बघ स्वर्गामधुनी।  

विसरून सगळे जग भवताली
टिपत दृश्य मी स्तब्ध होउनी
समजुन चुकलो मनोमनी मी
जगुया जीवन पुरे यौवनी!!

- अनिरुद्ध रास्ते