Saturday, 13 August 2016

आपला क्षण तिघांचा हवा!

आपल्या दोघांची पहाटमिठी
सोडवायला 'त्याचा' गजर हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या दोघांच्या गुलुगुलु गप्पांत
'त्याच्या' 'टिडिंग!' ला प्रतिसाद हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या दोघांच्या दूरभाषणात
'तो'च मधला दुवा हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपण दोघेच फिरायला जाताना
'त्याचा' हातात चाळा हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या मुलांना खूष ठेवायला
'त्याच्या'वर एखादा गेम हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

तुझ्या नि माझ्या एकजीवाचा
'त्याने'च केला गेम तरी,
आपला क्षण तिघांचा हवा!!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 3 August 2016

गुलमोहर...

अग्नीस घट्ट पिळुनी,
फुलपाकळी भरोनी,
तत्त्वास निराकारी
साकार करुन गेला।।

गुलमोहरा पुसावे
गुपित रंगण्याचे।
लेऊन उष्ण रंग
शांती लुटून गेला।।

असला अपर्ण तरीही
सावली करून गेला।
केशरी छटा धरुनी
शिकवून त्याग गेला!!

-अनिरुद्ध रास्ते

Tuesday, 12 July 2016

काही वाद्यांचे स्वभाव!

पखवाज: अनुभव, गांभीर्य, शहाणपण, संयम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणारे भीष्मपितामह!  त्रकधेत् त्तांऽऽऽ तिटकतगदिगन धांऽऽ वाजताच ताठ बसायला लावणारे तालवाद्य.

सारंगी: कारुण्य, आर्तता आणि वैराग्य एकत्र करून तारांमध्ये भरले की सारंगी बोलते. कितीही कठोर ह्रदयाला पाझर फोडणारे स्वर निर्माण करण्याचे कौशल्य या वाद्यात आहे.

मृदंग: सहज सोपा भक्तीमार्ग आळवणारे वाद्य. स्वररूपी अध्यात्माला तालरुपी भक्ती देणारा सोपान!

संतूर: कोरीव नाजुकता आणि अवखळ चंचलता हे या वाद्याचे स्वभाव आहेत.  राकट दगडांवर पावसाचे थेंब पडताच दगडालाही शहारे यावेत तसे संतूरचे स्वर वाटतात. टपकन् पडलेल्या थेंबाचे अनेक तुषार सर्व बाजूंना उडावेत तशी संतूरची कंपने सगळीकडे उडतात!

सरोद: हे खास राजेशाही वाद्य आहे. उंची कलाकुसर केलेल्या दरबारात, उत्तम कपडे आणि साजशृंगार करून, शांतचित्ताने, कलाकुसरीसह स्वरांचा आस्वाद घेण्याचे हे वाद्य आहे!

सनई: मांगल्य! हा एकच शब्द या वाद्याचा स्वभाव सांगण्यास पुरेसा आहे. सनई आणि सुरपेटीचा पॅंऽऽऽ होताच भटजी, चौरंग, कलश, नटलेल्या सुवासिनी, हार तुरे.... सगळे डोळ्यासमोर आलेच पाहिजे!

ढोल ताशा: ढोलताशा म्हणजे जल्लोष,  सवालजबाब, बेधुंद नाच, कडक आश्वासन आणि शिस्त! खास मर्दानी, 'दिमाग की बत्ती जलानेवालं' वाद्य! तड् तड् ततड् तर्रर्रर्र ऐकून ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो माणूसच नव्हे!

सतार: कधी सुवर्णालंकृत, अष्टपुत्री नेसून बोहल्यावर चढायला उत्सुक सौभाग्यकांक्षिणी, कधी नखशिखांत भरजरी साज करून वैभवात दरबारात अवतरणारी राजविलासिनी, तर कधी वेधक, मादक अदांनी प्रियकराशी प्रणय करणारी प्रेमिका अशी अनेक रूपे -वेळप्रसंगी एकाच वेळी- घेऊन येणारी स्वर्गीय अप्सरा असेच सतारीचे वर्णन करावे लागेल.

---


-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 25 June 2016

सुगुण मातीचे...

सुगुण मातीचे विसरू नको कधी
सतत स्वतःला आठवण देणे।
लेप लाविता डंखावरती
मायेचा ओलावा देणे।
भिजवुनी, बडवुनी फिरविली तरी
सुंदरसा आकारही घेणे।
नांगरफाळ जरी उदरी घुसला
अनाथ बीजा जीवन देणे।।

-अनिरुद्ध रास्ते

Thursday, 26 May 2016

मैत्र पुरते बहरुन यावे!

ज्यांना येते काव्य त्यांनी, दोन कडवी लिहून द्यावी।
ज्यांना कळते रसमाधुर्य, त्यांनी मग दाद द्यावी।।

ज्यांना येते सूरसंगीत, त्यांनी थोडी चाल द्यावी।
ज्यांचा गळा गोड त्यांनी, एखाददुसरी तान द्यावी।।

येई तबलापेटी ज्यांना, त्यांनी सुंदर साथ द्यावी।
कानसेन जे असती येथे, त्यांनी समेला टाळी द्यावी।।

फुलून येण्यासाठी येथे, पुनर्भेटीचे कोंदण व्हावे
सर्वांसंगे देता घेता, मैत्र पुरते बहरुन यावे।।

-अनिरुद्ध रास्ते

Tuesday, 24 May 2016

मंगलाष्टके!


[चाल: स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं... ]

आईने तुज घास भरविला संतुष्ट तो खाउन।
गोटाही तुळतुळीत करुनी शुभचिन्ह वर काढुन।
नेसोनी लघुवस्त्र एक कटिला दंडास उंचावुन।
झाला आज इथे प्रकट हो पृथ्वीवरी वामन।।

सुमुहूर्त सावधान...

जाशी आज गुरुमंदिरी ममसुता चिंता मनी ना धरी।
मायाही करी, तोहि तुजवरी या आईवडिलांपरी।
ज्ञानामृत देउनी वरि करी तेजस्वि सूर्यापरी।
आशीर्वाद समस्त साथ असती ब्रह्मव्रता तू धरी।।
सुमुहूर्त सावधान...

-अनिरुद्ध रास्ते
(सर्व बटूंना आशीर्वाद म्हणून ही मंगलाष्टके! मुक्तपणे वापरू/पुढे पाठवू शकता!)

रोज सकाळी उठल्यावर

रोज सकाळी उठल्यावर
पेंगत बाहेर येतो तेव्हा
तुझ्या हातचा वाफाळता चहा
माझ्याआधीच हजर असतो
यासारखी जाग ती काय?

दोघांच्याही आवरण्यात
वेळामध्ये वेळ काढून
माझ्यासाठी आवडीचा
डबा हातात तयार असतो
यासारखी शिदोरी ती काय?

मी कामावर निघताना
दार लोटून घेण्याआधी
तुझ्या 'तश्याच' अवतारात
'बॉबी'सारखा टाटा करतेस
यासारखी ओढ ती काय!

कधीतरी बघताना
चोरून थोडं 'गोरं' अंग
लक्षात येताच,क्षणिकच,
पण जो कटाक्ष टाकतेस
त्यासारखा वचक तो काय!

कपड्यांच्या दुकानातच
कपडे बदलून बाहेर येऊन
नजरेतूनच फक्त माझी
अनुमती तेवढी मागतेस
यासारखी आस ती काय?

रोजचं माहित असलं तरी
संध्याकाळ होता होता
'घरी कधी येणार?' असा
प्रश्न तरीपण विचारतेस
यासारखी काळजी ती काय?

कितीही उशीर झाला तरी
वेळ निघून गेली म्हणून
बाहेर खाऊन आलो तरी
जेवणासाठी थांबून राहतेस
यासारखी माया ती काय?

कसाही जरी असलो तरी
माहेरी माझं कौतुक ऐकून
खालचा ओठ हळूच चावून
चेहरा लपवून हळूच हसतेस
यासारखी लज्जा ती काय?

पाडव्यासाठी ओवाळताना
निरांजनाच्या प्रभेमध्ये
डोळ्यांमध्ये चमक आणून
गोड स्मितहास्य करतेस
यासारखी तृप्ती ती काय?

-अनिरुद्ध रास्ते