यंत्रे फिरती, पिळती, कुटती
तोडुन, कापुन, पुन्हा जोडती
ध्यास घेतला नवनिर्मितिचा
अश्वमेध हा यंत्रयुगाचा।
धूर ओकती, विषें सोडती
प्रदूषणाचे डोंब उसळती
क्षणही एक ना सोडायाचा
अश्वमेध हा यंत्रयुगाचा!
माना मोडुन रात्र जागती
कळपाटीवर हात चालती
जीव घुसमटे संगणकाचा
अश्वमेध हा यंत्रयुगाचा!
अजिंक्य अमुचा प्रगतीवारू
अडविता कुणी युद्धही करू
माथीं शिरला गर्व प्रगतिचा
अश्वमेध हा यंत्रयुगाचा!
निसर्ग देई मग चपराक
कंप, त्सुनामी, विषाणु एक
पाय अडखळे पूर्ण जगाचा
अश्वमेध हा यंत्रयुगाचा!
श्वास एकदा घेई मानवा
जपून वापरी निसर्गठेवा
तुलाच तुडविल तव कर्माचा
अश्वभेध हा यंत्रयुगाचा!
- अनिरुद्ध रास्ते
Friday, 13 November 2020
अश्वमेध हा यंत्रयुगाचा
Sunday, 7 June 2020
रीत मानवी
उमलत होतो भल्या सकाळी,
आईच्या मी अंगावरती
मानत होतो आभार तिचे अन्
सुगंध पसरुनी वार्यावरती
रंग उधळुनी भुलवित होतो
मधुमक्षीसह मी भ्रमरांना
नाजुक बोटे मज स्पर्शावी
अशीच होती मनी कामना!
हात एक नाजुकसा आला,
आः!! मजला तोडुन गेला,
टाकुन इतरांसह
परडीत
आनंदाने पुढे चालला!
किती कुळांची किती भावंडे
परडीमध्ये तशीच पडली
तुटली जरी का मातांपासुन
रंग,सुगंध उधळीत राहिली!
ताटातुट घडवून आमुची
प्रणया वा भक्तीला सजवी,
आवड असली अप्पलपोटी!
हीच तुझी का रीत मानवी?Monday, 13 April 2020
वसंतगीत
वसंत फुलला वनावनातुन
रंग प्रकृती खेळतसे
विविध फुलांतुन ओसंडुन ये
ऋतुराजाचे प्रेम असे।
पीतरंग हा रंगराज जणु
उत्सव त्याचा आज असे
फुल्ल धुमारे सांगत येती
राजाचे प्रतिहारी जसे।
अंश सांडला चंडांशुचा
झेलुन धरिती तरू शिरी
चालुन दमला रवी नभातच
घाम टपकला धरेवरी।
घोस फुलांचे बहरुन येती
उधळत पराग सगळिकडे
नवनवरीला हळद लागली
पिवळे कर तळहात गडे।
जेजुरगडचा खंडेराया
उत्साहाने जणु डोले
पहा वाटला प्रसाद त्याचा
येळकोटचे चांगभले।
वसंत उत्सव इथे मांडला
उत्साहे गाऊ गीत
पीतरंग हा सांगत आला
अमर तुझीमाझी प्रीत!
- अनिरुद्ध रास्ते
Thursday, 9 April 2020
कोंकण जगणे!
वाट आळशी दगडांमधली
माड गाळती अवखळ किरणे
गाज ऐकु ये चित्रामधुनी
ऐसे सुंदर कोकण जगणे!
या भूवर अपरांत जन्मला
भार्गवरामाच्या कृपेने,
पाचूं जडवुन पदरावरती
धरा नेसली हिरवी वसने!
सागरलाटा अखंड करिती
दंगामस्ती अतिनेमाने
कोकणभूच्या अंगावरती
सतत कोरती नाजुक लेणे
सह्यकड्यांची बघून छाती
जलद बरसती पुर्या दमाने,
अंगावरती घेऊन त्यांना
माड उरकती सचैल स्नाने!
यांवा कोंकण आंपलेंच हों
म्हणती किती जन आनंदाने
हिशेब करिती कणाकणाचा
लख्ख विजेच्या तत्परतेने!
गणरायावर अपार भक्ती
आंबे, काजू येथे पिकती
सागरात वा रानामध्ये
कुठेच खाणे नाही उणे!
वर्षामधुनी एकदातरी
धूळ येथली पायी लावणे
हृदयामध्ये भरून घेणे
ऐसे सुंदर कोंकण जगणे!!
Wednesday, 8 April 2020
पुळणीचे प्रेमगीत
तो येउन भेटुन गेला
मज चिंब भिजवुन गेला।
खुणा प्रणयक्रीडांच्या
मजवरी सोडुनी गेला।।
मी स्तंभित इथेच पडुनी
कुणी तुडवी मज पायांनी।
भाजतो सूर्य किरणांनी
मन झुरे वाट पाहूनी।।
लाटांवर होऊनी स्वार
तो नक्की पुन्हा येईल
घेउन जाईल मजला
आणून पुन्हा सोडेल!
हे अखंड चालायाचे
चक्र विरह-मिलनाचे।
कण कण भिजवायाचे
कण कण झिजवायाचे।।
Thursday, 31 October 2019
सरे दिवाळी
सरली चकली, सरला चिवडा
कडबोळ्यांचा डबा संपला।
उत्सवराजा दीपोत्सवही
आठवणींच्या रुपे राहिला।।
लाडुऐवजी भुगाच थोडा
चिरोटे कुठे? साखर दिसली।
वड्या सफाचट, कणही नाही
बर्फीचा तर वर्ख राहिला।।
बाण संपले, उरल्या काड्या
लवंगिच्या तर लाल चिंधड्या।
फुलबाज्यांच्या काळ्या तारा,
बाँब? अरे, सुतळ्यांचा बोळा!!
सगेसोयरे परतुन जाती
पणत्या पडती रित्या बिचार्या।
नाही म्हणाया नभोदीप तो
आठवणींना देई उजाळा।।
समजुन घे तू नियम नियतिचा
लघुजीवी क्षण आनंदाचे।
'पुन्हा मिळो' ही आशा आहे
आपले कारण पुढे जगण्याचे!
- अनिरुद्ध रास्ते
Friday, 27 September 2019
'थ'
थांब जरा नको जाऊ अशी दूरदूर
थोडा सहवास असो माझ्या बरोबर
थिरकते तन माझे तुझ्या तालावर
थरथरे मन माझे तुझ्या तानेवर
थांग नाही प्रीतीला या तुझ्यामाझ्यातील
थोपविता येत नाही आतला कल्लोळ
थिजलेल्या भावनांना येऊ दे वितळ
थेंब थेंब पाघळू दे शब्द अनावर
थिटे दोन्ही हात माझे घेण्यास कवेत
थोर तुझे मन किती घेतेस कुशीत
थांब जरा नको जाऊ अशी दूरदूर
थोडा सहवास असो माझ्या बरोबर!
-अनिरुद्ध रास्ते
Subscribe to:
Posts (Atom)




