Sunday, 7 August 2022

जाळे मनिचे

अथांग निळ्यावर 
अर्धी पसरली पाने,
शंभरीतल्या पन्नाशीचा
आलेख काढला त्याने!

विणले वाटे 
विचारजाळे मनिचे
उरले कितितरी
अजून अनुभवण्याचे।

अल्याड जाळिच्या, 
भौतिक विश्व जे जगले
पल्याड राहिले, 
अनंत किती बघण्याचे।

या जाळ्यातच 
अडकला जिवाचा मासा
तुटेल जेव्हा, 
तो क्षण मुक्तिचा खासा!

-अनिरूद्ध रास्ते

Monday, 20 June 2022

पन्नाशी आली!

दुसर्‍या सत्राची तरुणाई आली
पुनर्जन्माची जणु नांदीच झाली
अनुभव, उत्साह घेऊन आली,
आली आली आली पन्नाशी आली!

युवाही नाही नि वृद्धही नाही,
उच्छृंखल नाही नि शिथिल नाही,
संयमासह शक्तीला घेऊन आली
आली आली आली पन्नाशी आली!

कुठे केसांना पांढरी किनार
कुठे नजरेला चाळीशी आधार
सुटलेली पोटं पट्यानी बांधली
आली आली आली पन्नाशी आली!

तूतूमैमै आता सोडून देऊ
मिळाले जे त्याचा आनंद घेऊ
हौसेने जगण्याची वेळ ही आली
आली आली आली पन्नाशी आली!

- अनिरुद्ध रास्ते

Thursday, 21 April 2022

चिरंतन माझा कान्हा!

तो निघून गुपचुप गेला,
मन तिथेच अडले होते,
नाजूक तिच्या हातांनी
हृदयी धरले होते!

पाय निघेना झाला
तरी कर्तव्याची आस
सोडून तिच्यासह गेला
अपुल्या मोरपिसास!

झोपेत तिच्या वदनावर
असीम शांतता होती
अन् सौख्यसमाधानाची
भरती अखंड होती

वळताच कुशीला खुपली
जरी शय्या ती मखमाली
दर्शन मोरपिसाचे
गालांवर खुलवी लाली!

जरी दूर देहाने
तो कधीही, कितीका झाला
हृदयी प्रेमभराने
चिरंतन माझा झाला!!!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 26 March 2022

बरळिता!

बरळ बरळ बरळ किती
निकस काव्य बाईऽऽऽ
वृत्त-जातिप्रती झटता,
अर्थ कळत नाहीऽऽऽ

दंगुनी व्यंगात बधिर
बरळ बोलती,
निरस निरस कथवुनी
वृत्बंध तोडितीऽऽऽ

बरळाचा भंकससा 
गरळ ओकती,
थातुरमातुर परी शेवटी
स्फुटत स्फुटत जाईऽऽऽ

- अनिरुद्ध रास्ते

Saturday, 4 December 2021

आपल्याला आपला चहाच बरा!

कुठे ती नक्षी नि कपाचा तोरा
वाफेची फुसफुस, फेसाचा नखरा
साधासुधा रांगडा मित्रच खरा
आपल्याला आपला चहाच बरा!

लावा रे फिल्टर, गाळा रे कट
उरकतच नाही, काही पटापट
किटलीतून ओता, नि समोर धरा!
इतका सोपा आपला चहाच बरा!

कुठेही उकळा, कसाही गाळा
चिमट्याने पिळा, पिशवीतून घोळा
वेळेला कामाचा मित्रच खरा
आपल्याला आपला चहाच बरा!

हिच्या काही गोतांनी केली फितुरी
मैत्रीण जोडली काळी चिकोरी
'फिल्टर' नावें झाली दक्षिणी सुंदरा!
तरीही आपल्याला चहाच बरा!

वडे आणि भज्यांसंग हिचे नाही जमत
उभी नाही राहत ही पावसात भिजत!
तिथे येतो मदतीला उबेचा झरा,
आपल्याला आपला चहाच बरा!

कुठेही असतो, कधीही मिळतो
मित्रांच्या कोंडाळ्यात मिसळून जातो
अमृताला येतील का कशायाच्या सरा?
आपल्याला आपला चहाच बरा!
आपल्याला आपला चहाच बरा!

- अनिरुद्ध रास्ते

Thursday, 28 October 2021

समुद्राचे स्वगत!

मी आतुर करण्या स्वतःवर कुरघोडी
भेटण्या किनार्‍या, नसे तमा मज थोडी
कधी वाळूवर पसरून घालवी शक्ती
कधी दगडांवर धडकून डोके फोडी
काय मिळे मज करून अट्टाहास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

हेलावी मजला सतत पुढे अन मागे
उचंबळवे कधी, फणा काढण्या लावे
समजत नाही कसे आवरू मजला
अहंकार हा अजून नाही सुटला
कोण घडवितो असला जीवनप्रवास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

गुरुत्व जसे बाहेरिल खेळवी मजला,
बांधून तसेही ठेवी, कुणी आतुनी मजला
दिसलो जरि का उच्छृंखल बाहेरी
खोलात अनोखी सजली दुनिया भारी
कसे निर्मिले उदरी या विश्वास
कळले, बल हे अंतरातले खास!

सांगतो तुम्हाला, गुपित मला जे कळले
सांगावे वाटे, जरी कुणी मला ना पुसले
घेतला तुम्ही जर ध्यास आत्मज्ञानाचा
आणिक केला प्रयास अखंड साचा
जरी बाह्यप्रभावे, डळमळला विश्वास
बल अंतरातले सक्षम बनवी स्वतःस!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 23 October 2021

हिमालय!

स्तब्ध उभा तो तिथे दूरवरी
हिमालयाचा उंच कडा।
भीष्मपित्यासम आधारासह
कणखरतेचा देई धडा।

प्रचंड भिंती, खोल कपारी
सोंडा अन् ताशीव कडे।
बर्फातुनही डोके काढती
अदम्य टोकाची शिखरे।

जनक असा हा शतकन्यांचा
सागरास त्यां दान करी।
पुण्य महत्तम मिळवून सारे
बिंदु सगर्व सर्वोच्च धरी।

एक जावया शांत ठेवण्या
दिला राहण्या कैलास।
जावई दुसरा पूर्वपश्चिमी
पाय धुवुनी तोषवी त्यास।

असा हिमालय पर्वतराजा
मुकुट पृथ्वीचा मज भासे।
विश्वरूप ते अजस्त्र पाहुन
नकळत होइ नतमस्तकसे!

-अनिरुद्ध रास्ते