Thursday, 31 October 2019

सरे दिवाळी

सरली चकली, सरला चिवडा
कडबोळ्यांचा डबा संपला।
उत्सवराजा दीपोत्सवही
आठवणींच्या रुपे राहिला।।

लाडुऐवजी भुगाच थोडा
चिरोटे कुठे? साखर दिसली।
वड्या सफाचट, कणही नाही
बर्फीचा तर वर्ख राहिला।।

बाण संपले, उरल्या काड्या
लवंगिच्या तर लाल चिंधड्या।
फुलबाज्यांच्या काळ्या तारा,
बाँब? अरे, सुतळ्यांचा बोळा!!

सगेसोयरे परतुन जाती
पणत्या पडती रित्या बिचार्‍या।
नाही म्हणाया नभोदीप तो
आठवणींना देई उजाळा।।

समजुन घे तू नियम नियतिचा
लघुजीवी क्षण आनंदाचे।
'पुन्हा मिळो' ही आशा आहे
आपले कारण पुढे जगण्याचे!

- अनिरुद्ध रास्ते

Friday, 27 September 2019

'थ'

थांब जरा नको जाऊ अशी दूरदूर
थोडा सहवास असो माझ्या बरोबर

थिरकते तन माझे तुझ्या तालावर
थरथरे मन माझे तुझ्या तानेवर
थांग नाही प्रीतीला या तुझ्यामाझ्यातील
थोपविता येत नाही आतला कल्लोळ

थिजलेल्या भावनांना येऊ दे वितळ
थेंब थेंब पाघळू दे शब्द अनावर
थिटे दोन्ही हात माझे घेण्यास कवेत
थोर तुझे मन किती घेतेस कुशीत

थांब जरा नको जाऊ अशी दूरदूर
थोडा सहवास असो माझ्या बरोबर!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 18 September 2019

ध्वमाचे ध्वनी!

मनी पाहिले स्वप्न शांती, सुखाचे
परी दान उल्टे पडे प्राक्तनाचे
उध्वस्त भूमी पुरी यादवीने
उठे जीव माझा ध्वमाच्या ध्वनीने

दिशा सर्व गेल्या भरूनी भयाने
घुटे जीव माझा, धुरा-काजळीने
गळा आवळी वायु त्याच्या कराने
उठे जीव माझा ध्वमाच्या ध्वनीने

कधी स्फोट होती कधी आग लागे
मुठी जीव घेती, पळे गाव सारे
पशु आणि पक्षी उडाले भितीने
उठे जीव माझा ध्वमाच्या ध्वनीने

परी आंस माझ्या मनीची सुटेना
भविष्यास ऐसे बळी देववेना
म्हणूनी उभा राही ताज्या धिराने
दुणावे मनीषा ध्वमाच्या ध्वनीने !

-अनिरुद्ध रास्ते

Sunday, 18 August 2019

मिसळ!

उसळ म्हणाली पावाला
बघतोय मेला गाववाला ।
घाम फुटला कांद्याला
लिंबू पळाले कोपर्‍याला ।
शेव कोथिंबीर कुचकामी
तूच मला वाचवायला ।।

'लग्गेच येतो' पाव म्हणाला
जाळ तर्रीला घेऊन निघाला ।
तेल तिखटाचा कोट केला
मिळून करूया मुकाबला!
वेगळे उरलो नावाला
मिसळ म्हणूया आपल्याला!

ऐकतो कुठला गाववाला
चमचा घेऊन तो भिडला ।
तर्रीत टाकले पावाला
बाकीच्यांचा एकच काला ।
मिटक्या मारीत सगळे खाऊन
आनंदाने निघून गेला!!

- अनिरुद्ध रास्ते

Saturday, 15 June 2019

भिजलेल्या आठवणी. मुक्तछंद

पावसाळ्यात घट्ट होतात दरवाजे..
दोष देतो आपण
पावसाला...
पण उंबर्‍यातच अडकून असतात,
भिजलेल्या काही आठवणी!

उन्हाळ्यात सैल पडतो दरवाजा..
तोही वाळून जातो,
सहज लागतो..
पण वाळून बिचार्‍या
तिथेच असतात पडलेल्या,
भिजलेल्या काही आठवणी!

लावलेल्या दरवाजाच्या
फटी तशाच राहतात...
गारठतात, कुडकुडतात,
तरीही अडकूनच राहतात...
भिजलेल्या काही आठवणी!

ऋतू येतात जातात..
उंबरेही झिजतात...
मनाची माती झाली
तरी अंकुरत नाहीत....
भिजलेल्या काही  आठवणी!

-अनिरुद्ध रास्ते

Sunday, 12 May 2019

अशीही एक गत...

खुंटी गेली, तुटल्या तारा
फुटे भोपळा, भरला कचरा
नादब्रह्मदूतांचा राजा
तानपुरा जग सोडुन गेला।।

कठोर कुणितरी कंटकहृदयी
कृतघ्न, अरसिक , पुरा निर्दयी
स्वरसाजाला टाकुन गेला
तानपुरा जग सोडुन गेला।।

'सारे' सोबती सोडुन गेले
स्वरगंगेचा आत्मा 'गम'ला
गंधार स्वयंभू  लोप पावला
तानपुरा जग सोडुन गेला।।

पाठ राखण्या गाणार्‍याची
असून नसला, तरी असणारा
नादपटलाचा रंगारी हा
तानपुरा जग सोडुन गेला।।

"देह जरी का माझा पडला,
जगवा आत्मा अमर स्वरांचा"
पुसता डोळे, तोच बोलला
तानपुरा जग सोडुन गेला।।

- अनिरुद्ध रास्ते