Saturday, 4 December 2021

आपल्याला आपला चहाच बरा!

कुठे ती नक्षी नि कपाचा तोरा
वाफेची फुसफुस, फेसाचा नखरा
साधासुधा रांगडा मित्रच खरा
आपल्याला आपला चहाच बरा!

लावा रे फिल्टर, गाळा रे कट
उरकतच नाही, काही पटापट
किटलीतून ओता, नि समोर धरा!
इतका सोपा आपला चहाच बरा!

कुठेही उकळा, कसाही गाळा
चिमट्याने पिळा, पिशवीतून घोळा
वेळेला कामाचा मित्रच खरा
आपल्याला आपला चहाच बरा!

हिच्या काही गोतांनी केली फितुरी
मैत्रीण जोडली काळी चिकोरी
'फिल्टर' नावें झाली दक्षिणी सुंदरा!
तरीही आपल्याला चहाच बरा!

वडे आणि भज्यांसंग हिचे नाही जमत
उभी नाही राहत ही पावसात भिजत!
तिथे येतो मदतीला उबेचा झरा,
आपल्याला आपला चहाच बरा!

कुठेही असतो, कधीही मिळतो
मित्रांच्या कोंडाळ्यात मिसळून जातो
अमृताला येतील का कशायाच्या सरा?
आपल्याला आपला चहाच बरा!
आपल्याला आपला चहाच बरा!

- अनिरुद्ध रास्ते

Thursday, 28 October 2021

समुद्राचे स्वगत!

मी आतुर करण्या स्वतःवर कुरघोडी
भेटण्या किनार्‍या, नसे तमा मज थोडी
कधी वाळूवर पसरून घालवी शक्ती
कधी दगडांवर धडकून डोके फोडी
काय मिळे मज करून अट्टाहास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

हेलावी मजला सतत पुढे अन मागे
उचंबळवे कधी, फणा काढण्या लावे
समजत नाही कसे आवरू मजला
अहंकार हा अजून नाही सुटला
कोण घडवितो असला जीवनप्रवास
नकळे, परी हे बल बाहेरिल खास!

गुरुत्व जसे बाहेरिल खेळवी मजला,
बांधून तसेही ठेवी, कुणी आतुनी मजला
दिसलो जरि का उच्छृंखल बाहेरी
खोलात अनोखी सजली दुनिया भारी
कसे निर्मिले उदरी या विश्वास
कळले, बल हे अंतरातले खास!

सांगतो तुम्हाला, गुपित मला जे कळले
सांगावे वाटे, जरी कुणी मला ना पुसले
घेतला तुम्ही जर ध्यास आत्मज्ञानाचा
आणिक केला प्रयास अखंड साचा
जरी बाह्यप्रभावे, डळमळला विश्वास
बल अंतरातले सक्षम बनवी स्वतःस!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 23 October 2021

हिमालय!

स्तब्ध उभा तो तिथे दूरवरी
हिमालयाचा उंच कडा।
भीष्मपित्यासम आधारासह
कणखरतेचा देई धडा।

प्रचंड भिंती, खोल कपारी
सोंडा अन् ताशीव कडे।
बर्फातुनही डोके काढती
अदम्य टोकाची शिखरे।

जनक असा हा शतकन्यांचा
सागरास त्यां दान करी।
पुण्य महत्तम मिळवून सारे
बिंदु सगर्व सर्वोच्च धरी।

एक जावया शांत ठेवण्या
दिला राहण्या कैलास।
जावई दुसरा पूर्वपश्चिमी
पाय धुवुनी तोषवी त्यास।

असा हिमालय पर्वतराजा
मुकुट पृथ्वीचा मज भासे।
विश्वरूप ते अजस्त्र पाहुन
नकळत होइ नतमस्तकसे!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 20 October 2021

निर्झर

खळखळ वाहत निर्झर धावे
हिरव्या घनवनराजीमधुनी
जिना उतरते अल्लड कन्या
पायांमध्ये पैंजण घालुनी!

जणु घातला शुभ्र झगा अन्
नक्षी काढली तुषार गुंफुनी
जलबिंदूंची माळ गळा अन्
घुंघट धरला जलधारांनी।

दाखवि सुंदर पदलालित्य
उसळत अवखळ दगडांमधुनी
जणु नाचते नृत्य अप्सरा
अवतरली बघ स्वर्गामधुनी।  

विसरून सगळे जग भवताली
टिपत दृश्य मी स्तब्ध होउनी
समजुन चुकलो मनोमनी मी
जगुया जीवन पुरे यौवनी!!

- अनिरुद्ध रास्ते

Tuesday, 22 June 2021

वळणावर!


कशास छळसी स्वतः जिवाला
आठव काढून या वळणावर,
तिथेच मी तर भरुन राहिले
अनुभव मजला इथेच क्षणभर!

कधी वार्‍यावर स्वार होउनी
तुला बिलगते मी नाजुकसर,
गंध होउनी कधी फुलांचा
जादू करते तव श्वासांवर।

रूप घेउनी पानफुलांचे
तिथेच फुलते मी झाडांवर,
शरीर जरी का पडले शिशिरी
चुंबू बघते तुझेच पद, कर!

पाउस होउन कधी मी अवखळ
भिजवू बघते तुझेच आंतर,
कधी कवडसा होत उन्हाचा
निसट-भेटते कधी क्षितिजावर।

नकोस होऊ हळवा वेड्या,
मीलन आपुले असे निरंतर
जवळिक इतकी आपल्यातली
तुझ्याच ह्रदयी माझे मंदिर!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday, 29 May 2021

पिंपळ

मजबुत, लवचिक फांद्या घेउन
आकाशास गवसावे।
दणकट बांधा उभा रोवुनी
वर्षे अनेक जगावे।।

सळसळ गंभीर, गूढ तयाची
वार्‍यासंग झुलावे।
लक्ष वेधतो जणु हलवुनी
लक्षलक्ष तळवे।।

पारासह, वाड्यांसह जीवन
एकनिष्ठ कंठावे।
कुठे रुजावे, कसे जगावे
याच्याकडून शिकावे।।

- अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 27 January 2021

मी तुझा अन् माझी तू!

तीळ मी, अन् गूळ तू,
स्निग्ध मी, अन् गोड तू।
सूक्ष्म मी, अन् विश्व तू
मी तुझा, अन् माझी तू!!

रेघ मी अन् ओाघ तू
रंग मी अन् भाव तू
विषय मी अन् अर्थ तू
मी तुझा, अन् माझी तू!!

चक्र मी अन् अक्ष तू
वेग मी, आवेग तू
चंद्र मी, अन् पृथ्वी तू
मी तुझा अन् माझी तू!!

- अनिरुद्ध रास्ते