Sunday 25 December 2016

प्रिय आज्ञावलीस...

प्रिय आज्ञावलीस,

स.न.वि.वि.

पत्र लिहीण्यास कारण की,..... तशी वेळ आली!

गेली १९ वर्षं मी तुला लिहीतोय, पण तुझ्याबद्दल पहिल्यांदाच! संसारात जशी बायको हळूच येते आणि सगळा कब्जा घेते, तशीच तू, आय्टीवाल्याच्या करीयरचा कब्जा घेणारी. कधीकधी बायको विसरायला लावून तुझाच विचार करायला लावणारी!

'तुझ्यासंगे संगणकाचं खेळणं करू' अशी गुर्मी असणार्‍या आयटोबाची ऐट हळूहळू उतरवून संगणकाच्या संगतीनं माझंच खेळणं करणारीही तूच! डेव्हलपर, टेकलीड, एक्सपर्ट, आर्किटेक्ट असे माझ्यातले बदल स्वतःही बदलून अनुभवणारीही तूच! आणि वेगवेगळे प्रोग्रॅम लिहीताना अनेक रूपांत तुला निर्माण करण्याच्या माझ्या परफॉर्मिंग आर्टची साक्षीदारही तूच!

कधी सह-कार्यचारिणी, कधी डोक्यात चढणारी दारू, आणि कायम माझ्या प्रगतीचा आलेख असणारी तू, एक रूप मात्र शेवटीच दाखवून जातेस. 'रिलीज' च्या वेळी कळतं, आता तुझ्यात बदल शक्य नाही! तुझं रुपांतर झालंय! आता तू आज्ञावली नाहीस, प्रोग्रॅम झालीयेस! मी शिकवल्याप्रमाणे संगणकाबरोबर सहजीवनासाठी तयार झालीयेस! आज तू पाठवणीला तयार झालेली पोर झालीयेस! शिकवायचं ते सगळं शिकवून झालं. यापुढे तुला शिकवता येणार नाही! तुझ्या तिथल्या वागण्यावरूनच लोक तुझी - आणि माझीसुद्धा - किंमत करणार आहेत!  मुलीच्या बापाच्याही मनात असेच विचार येत असतील नाही? असा एक मुलीचा बाप होण्याचाही अनुभव देऊन जाणारी तूच!

असो! तुझ्याबद्दल लिहीताना तुला लिहायचंच विसरून गेलो. चल, आपल्याला प्रोग्रॅम बनवायचाय ना? मी सांगतो तसं कर! तुला ऐरणीवर ठेवून घण घातल्याशिवाय मला हवा तसा प्रोग्रॅम तयार होणार नाही. सवडीने पुन्हा कधीतरी सांगीन तुला, तुझ्याचबद्दल!

अनिरुद्ध.

Tuesday 20 December 2016

शार्ड!

धुक्यात घुसला गगनचुंबी हा 'शार्ड' मनोरा!
आकाशाच्या मिठीत जाउनी जणु हा बसला
लाज लपविण्या लपेटून घे का शालीला?
नको दिसाया कुणास असला प्रणयमामला!

काही असो परी, कठिण लपविणे प्रेमधुमारे
सर्वांगावरी तरीच दिसती दीपशहारे
जगा सांगती बोंबलुनी ते पारददिवटे
नाही बरंका शार्ड-नभाचे प्रेमही खोटे

जरी वाटती उच्चाकांक्षी कठिण वृत्तीचे
हृदयी त्यांच्या भरून असते मार्दव साचे
ताठ उभा हा शार्ड इथे या लंडनापुरी
मजला दिसली नाजुक बाजू तया अंतरी!!

-अनिरुद्ध रास्ते


Tuesday 15 November 2016

हेमंत प्रणय

अधर रक्त हे प्रेमरंगले
चित्रकलेचा कळस असे।
एकरंग परी छटा अनंत
चित्रकारही मदन असे।।

इंद्र वापरे सात रंग परी
शोभा त्याची फिकी पडे।
प्रणयाचा हा रंग एकटा
सर्वांनाही भारी पडे।।

नसती डोळे नसे नासिका
कपोल नसती मुखावरी।
फक्त ओठ हे पेलुन धरती
प्रणयाचे शिवधनु परी!

- अनिरूद्ध रास्ते

Sunday 9 October 2016

विश्वजालसंवादोऽध्यायः

अर्जुन उवाच।।
लिखित्वाऽपि दीर्घलेखं
रोच्यभावं न प्राप्यते ।
भग्नह्रदयः, हतोत्साहः
निपुणफलकं त्यजाम्यहम् ।।

दृष्ट्वा भग्नं गुडाकेशं
वदति वाक्यं च केशव।
विश्वजाले भाषणार्थं
त्रीणि सूत्राणि संस्मरेत् ।।

अभिव्यक्तिं रोच्यमानाः
प्रेषयन्ति प्रतिक्रियान् ।
रोच्यमानाः अशक्तास्तु
एकमेकं वदन्ति च।

अपव्यक्तिः विरुद्धाश्च
अस्ति येषां मतिर्जुन।
न श्लाघ्यंति त्रिकालेऽपि
ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।

प्राप्ते वा, न प्राप्ते वा
किमप्यर्थाः प्रतिक्रियाः ।
विश्वजाले कुरू योग्यं
अनिरुद्धं मतार्पणम् ।।

इति विश्वजालसंवादोऽध्यायः ।।

- रास्तेकुलोत्पन्नो अनिरुद्धः

Monday 5 September 2016

मूर्तीलाही मुक्तीचा...

पाहता आकाश ते
पक्षी मनी झेपावले ।
हाय माझे कर्म की
मूर्ती म्हणुनी राहिले ।।

नीलिमा नभी दाटली
मुक्तिची परिकल्पना ।
बांधली काया परी
येई नशीबी वंचना ।।

जाउ दे मनपक्षी ते
त्यांस तरी का थांबवू?
बंधनाचे दुःख माझ्या
अजुन मी का वाढवू?

मुक्ती मिळुनी ते जरी
जाती उडुनी दूर का ।
फिरुनी माघारी परी
येती, मज विश्वास हा !

घेउनी येती सवे
मुक्तिच्या अनुभूतीला
मूर्तीलाही मुक्तीचा
आनंद क्षणभर भावला ।।

-अनिरुद्ध रास्ते

 (http://www.jean-pierre-augier.com/index.php/sculptures-monumentales La-Paix, Ilonse)

Saturday 13 August 2016

आपला क्षण तिघांचा हवा!

आपल्या दोघांची पहाटमिठी
सोडवायला 'त्याचा' गजर हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या दोघांच्या गुलुगुलु गप्पांत
'त्याच्या' 'टिडिंग!' ला प्रतिसाद हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या दोघांच्या दूरभाषणात
'तो'च मधला दुवा हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपण दोघेच फिरायला जाताना
'त्याचा' हातात चाळा हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

आपल्या मुलांना खूष ठेवायला
'त्याच्या'वर एखादा गेम हवा,
आपला क्षण तिघांचा हवा!!

तुझ्या नि माझ्या एकजीवाचा
'त्याने'च केला गेम तरी,
आपला क्षण तिघांचा हवा!!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday 3 August 2016

गुलमोहर...

अग्नीस घट्ट पिळुनी,
फुलपाकळी भरोनी,
तत्त्वास निराकारी
साकार करुन गेला।।

गुलमोहरा पुसावे
गुपित रंगण्याचे।
लेऊन उष्ण रंग
शांती लुटून गेला।।

असला अपर्ण तरीही
सावली करून गेला।
केशरी छटा धरुनी
शिकवून त्याग गेला!!

-अनिरुद्ध रास्ते

Tuesday 12 July 2016

काही वाद्यांचे स्वभाव!

पखवाज: अनुभव, गांभीर्य, शहाणपण, संयम आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणारे भीष्मपितामह!  त्रकधेत् त्तांऽऽऽ तिटकतगदिगन धांऽऽ वाजताच ताठ बसायला लावणारे तालवाद्य.

सारंगी: कारुण्य, आर्तता आणि वैराग्य एकत्र करून तारांमध्ये भरले की सारंगी बोलते. कितीही कठोर ह्रदयाला पाझर फोडणारे स्वर निर्माण करण्याचे कौशल्य या वाद्यात आहे.

मृदंग: सहज सोपा भक्तीमार्ग आळवणारे वाद्य. स्वररूपी अध्यात्माला तालरुपी भक्ती देणारा सोपान!

संतूर: कोरीव नाजुकता आणि अवखळ चंचलता हे या वाद्याचे स्वभाव आहेत.  राकट दगडांवर पावसाचे थेंब पडताच दगडालाही शहारे यावेत तसे संतूरचे स्वर वाटतात. टपकन् पडलेल्या थेंबाचे अनेक तुषार सर्व बाजूंना उडावेत तशी संतूरची कंपने सगळीकडे उडतात!

सरोद: हे खास राजेशाही वाद्य आहे. उंची कलाकुसर केलेल्या दरबारात, उत्तम कपडे आणि साजशृंगार करून, शांतचित्ताने, कलाकुसरीसह स्वरांचा आस्वाद घेण्याचे हे वाद्य आहे!

सनई: मांगल्य! हा एकच शब्द या वाद्याचा स्वभाव सांगण्यास पुरेसा आहे. सनई आणि सुरपेटीचा पॅंऽऽऽ होताच भटजी, चौरंग, कलश, नटलेल्या सुवासिनी, हार तुरे.... सगळे डोळ्यासमोर आलेच पाहिजे!

ढोल ताशा: ढोलताशा म्हणजे जल्लोष,  सवालजबाब, बेधुंद नाच, कडक आश्वासन आणि शिस्त! खास मर्दानी, 'दिमाग की बत्ती जलानेवालं' वाद्य! तड् तड् ततड् तर्रर्रर्र ऐकून ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो माणूसच नव्हे!

-अनिरुद्ध रास्ते

Saturday 25 June 2016

सुगुण मातीचे...

सुगुण मातीचे विसरू नको कधी
सतत स्वतःला आठवण देणे।
लेप लाविता डंखावरती
मायेचा ओलावा देणे।
भिजवुनी, बडवुनी फिरविली तरी
सुंदरसा आकारही घेणे।
नांगरफाळ जरी उदरी घुसला
अनाथ बीजा जीवन देणे।।

-अनिरुद्ध रास्ते

Thursday 26 May 2016

मैत्र पुरते बहरुन यावे!

ज्यांना येते काव्य त्यांनी, दोन कडवी लिहून द्यावी।
ज्यांना कळते रसमाधुर्य, त्यांनी मग दाद द्यावी।।

ज्यांना येते सूरसंगीत, त्यांनी थोडी चाल द्यावी।
ज्यांचा गळा गोड त्यांनी, एखाददुसरी तान द्यावी।।

येई तबलापेटी ज्यांना, त्यांनी सुंदर साथ द्यावी।
कानसेन जे असती येथे, त्यांनी समेला टाळी द्यावी।।

फुलून येण्यासाठी येथे, पुनर्भेटीचे कोंदण व्हावे
सर्वांसंगे देता घेता, मैत्र पुरते बहरुन यावे।।

-अनिरुद्ध रास्ते

Tuesday 24 May 2016

मंगलाष्टके!


[चाल: स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं... ]

आईने तुज घास भरविला संतुष्ट तो खाउन।
गोटाही तुळतुळीत करुनी शुभचिन्ह वर काढुन।
नेसोनी लघुवस्त्र एक कटिला दंडास उंचावुन।
झाला आज इथे प्रकट हो पृथ्वीवरी वामन।।

सुमुहूर्त सावधान...

जाशी आज गुरुमंदिरी ममसुता चिंता मनी ना धरी।
मायाही करी, तोहि तुजवरी या आईवडिलांपरी।
ज्ञानामृत देउनी वरि करी तेजस्वि सूर्यापरी।
आशीर्वाद समस्त साथ असती ब्रह्मव्रता तू धरी।।
सुमुहूर्त सावधान...

-अनिरुद्ध रास्ते
(सर्व बटूंना आशीर्वाद म्हणून ही मंगलाष्टके! मुक्तपणे वापरू/पुढे पाठवू शकता!)

रोज सकाळी उठल्यावर

रोज सकाळी उठल्यावर
पेंगत बाहेर येतो तेव्हा
तुझ्या हातचा वाफाळता चहा
माझ्याआधीच हजर असतो
यासारखी जाग ती काय?

दोघांच्याही आवरण्यात
वेळामध्ये वेळ काढून
माझ्यासाठी आवडीचा
डबा हातात तयार असतो
यासारखी शिदोरी ती काय?

मी कामावर निघताना
दार लोटून घेण्याआधी
तुझ्या 'तश्याच' अवतारात
'बॉबी'सारखा टाटा करतेस
यासारखी ओढ ती काय!

कधीतरी बघताना
चोरून थोडं 'गोरं' अंग
लक्षात येताच,क्षणिकच,
पण जो कटाक्ष टाकतेस
त्यासारखा वचक तो काय!

कपड्यांच्या दुकानातच
कपडे बदलून बाहेर येऊन
नजरेतूनच फक्त माझी
अनुमती तेवढी मागतेस
यासारखी आस ती काय?

रोजचं माहित असलं तरी
संध्याकाळ होता होता
'घरी कधी येणार?' असा
प्रश्न तरीपण विचारतेस
यासारखी काळजी ती काय?

कितीही उशीर झाला तरी
वेळ निघून गेली म्हणून
बाहेर खाऊन आलो तरी
जेवणासाठी थांबून राहतेस
यासारखी माया ती काय?

कसाही जरी असलो तरी
माहेरी माझं कौतुक ऐकून
खालचा ओठ हळूच चावून
चेहरा लपवून हळूच हसतेस
यासारखी लज्जा ती काय?

पाडव्यासाठी ओवाळताना
निरांजनाच्या प्रभेमध्ये
डोळ्यांमध्ये चमक आणून
गोड स्मितहास्य करतेस
यासारखी तृप्ती ती काय?

-अनिरुद्ध रास्ते

जरा शांत बसलो तर...

जरा शांत बसलो तर
बायका किती मदत करतात
'अहो ऐकलंत का' म्हणून
दहा वेळा डिस्टर्ब करतात


जाऊन भाजी घेऊन या
नाहीतर नारळ फोडून द्या
अहो जरा इकडे या
म्हणून काहीतरी काम काढतात
जरा शांत ...

कधी वाळत घाला कपडे
कधी सामान ठेवा तिकडे
हात नाही पोचत म्हणून
सारखे वरती चढायला लावतात
जरा शांत .....

माझा मोबाईल सवत जणु
तिचा मात्र मित्र खरा!
स्वतः मात्र सिरीयल पाहत
अर्धा स्वयंपाक करवून घेतात
जरा शांत ....

यांना खरेदीची हौस भारी
त्यातून फूस लावते दुसरी
लागता थोडा डोळा दुपारी
गावात गाडी हाकायला लावतात
जरा शांत ...

सर्वांसमोर जरी सांगतात,
सगळे निर्णय 'हे'च घेतात,
'मी काय म्हणते' असं म्हणून
'ह्या'च रीमोट कंट्रोल होतात
जरा शांत बसलो तर....

-अनिरुद्ध रास्ते

बाळ, आता थांबतो थोडं...

बाळ, आता थांबतो थोडं
आईला जरा चालू देतो ।
तिच्या वाटणीचे आभाळ
तिचे तिलाच पेलू देतो ।।


पुढे सतत चाललो मी
वाट नव्हती जरी दिसत ।
आणि मागे तुम्ही होतात
विश्वासाने पावले टाकत ।
गारव्याबरोबर वार्‍याचा
बोचरा अनुभव घेऊ देतो ।।
तिच्या वाटणीचे आभाळ...

माझ्या घरी सुद्धा मी
माझ्या कुळाचा दीपक होतो ।
माझ्यापेक्षा इतरांच्या
अपेक्षांचे ओझे वाहत होतो ।
आता तरी थोडा माझा
भार हलका करून घेतो ।।
तिच्या वाटणीचे आभाळ...

तीशीत पडले दायित्व
माझ्यावर दोन जीवांचे ।
मधले नाव माझे लावून
निश्चिंत झालात कायमचे ।
दायित्व नाही तरी
कर्तृत्व थोडे तिच्यावर सोडतो ।।
तिच्या वाटणीचे आभाळ......

खुलेन थोडा मी सुद्धा
स्वत:कडे नीट पाहीन ।
माझी सुद्धा स्वप्ने होती
याचा थोडा आनंद घेईन ।
दीपस्तंभ राहण्याऐवजी
थोडा आकाशकंदील होतो ।
तिच्या वाटणीचे आभाळ...

आभाळ सारखं निरभ्र नसतं
निळं मोकळं सुद्धा नसतं ।
अदृश्याचा आधार घेऊन
सुखद विमान व्हायचं असतं ।
विश्वरुपा आधी तिला
ढग, वादळ पाहू देतो ।
तिच्या वाटणीचे आभाळ
तिचे तिलाच पेलू देतो

 -अनिरुद्ध रास्ते

वडा पाव!

वडा पाव: कवी व्हर्जन
मेरे दुख रहे थे पांव
पोटमें कावळे काव काव
तो मैंने टपरीपे जाके
हाणा वडा पाव!

~~~~~~~~~~~~~~

वडापाव स्तोत्र:
गोलाकारं तबकशयनम्
स्वर्णवर्णं खमंगम् ।
पावयुक्तं चटणिसहितम्
सर्वैः खादितव्यम् ।।
क्षुधाशांतं उदरभरणम्
पुनर्खाद्याभिलाषम् ।
वंदे तुभ्यं वडापावम्
सर्वखाद्याधिराजम् ।।

~~~~~~~~~~~~~~~

वडापाव आरती:
जयदेवा जयदेवा जय वडापावा
तुमचा महिमा काय सांगावा ।
अन्नदेवाचा हा प्रसाद व्हावा
सर्वांना सारखा, सदा मिळावा ।।
उकडा बटाटे, ठेवा चुरून
मळून त्यासंगे कांदा लसूण
गोळे करून तेली तळून
मिरची ठेऊन बशीत द्यावा ।।
घेताच पहिला घास तोंडात
स्वर्गीय आनंदा नुरलासे अंत ।
चटणीसहित सर्वांनी खावा
अजून एखादा मागून घ्यावा ।।

-अनिरुद्ध रास्ते

नववर्षमिदम्

शुभक्षणपूरितलक्ष्मीप्रदम् ।
विजयविनोदविवेकयुतम् ।।
प्रियजनसुखकरशक्तीप्रदम् ।
हितकरमस्तु नववर्षमिदम् ।।

-अनिरुद्ध रास्ते

आमुच्या कपाळी आहे.....

चंद्रमा हसे नभी शांत शीतल चांदणे।
आमुच्या कपाळी आहे अमृतांजन लावीले..।।

चालता तिच्या सवे, वेळ नकळे जाहला।
चाटताना शीत गोलक वात शीतल बाधले।।
आमुच्या कपाळी आहे.....

चुंबु का तव गाल मी, धीर करुनी बोललो।
कावुनी मजवरी परी, शीर दगडी ठोकिले।।
आमुच्या कपाळी आहे.....

लक्ष नाही पाहुनी हळूच खोडी काढली।
दावुनी मज 'कराते', हाड माझे मोडिले!।।
आमुच्या कपाळी आहे.....

अश्रु येता आतुनी हळुच माफी बोललो।
त्याच हाताने तिने प्रेम मजला दाविले।।
आमुच्या कपाळी आहे.....

-अनिरुद्ध रास्ते

आता वाजले की बारा!!!!


सिंडरेला नाव माझे
नशीबच मागे फिरे
माझ्या घरी मीच राबाया ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...।।

सवतीची आई घरी
चुकता मी, दंगा करी
आवराया घरचा पसारा ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...
नाचामध्ये वेळ झाला
बूट माझा हरवला
आवरा आता राजकुमारा ऽऽऽ
मला जाऊ द्या ना घरी...
एकेदिशी हो दुपारी
खटखट दारावरी
राजदूत येई भेटाया ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...।।
बूट आलो घेउनिया
मालकीण शोधावया
सांगे मला पाय घालाया ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...।।
पाय तुझा नीट बसे
मालकीण तूच असे
जातो मी राजाला सांगाया ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...।।
राजकुमाराची प्रीत
माझ्यावरी मग होत
जाते मी महाली नांदाया ऽऽऽ
मला जाउ द्या ना घरी...।।
-अनिरुद्ध रास्ते

उठा उठा हो सकळीक...


उठा उठा हो सकळीक
भिजवून ठेवा कणिक
मुले बायको इत्यादिक
डबे भरून धाडावे।


करून नंतर स्नानदैनिक पूजापठण
टीव्ही पहावा बैसुन
सारा वेळ ।।

नंतर उघडुनी हातपाटी
जाउनि बसावे इंटरनेटी
फेसबुकी गाठीभेटी
घ्याव्या खाश्या ।।

संध्याकाळिचे खाणे
बायकोवरि ढकलिणे
आपण वाचित बसणे
वृत्तपत्र ।।

करुनी दमल्याचे सोंग
करावे झोपेचे ढोंग
सारे दुखतसे अंग
ओरडावे ।।

अनि म्हणे निर्दोष
करणे आत्मनामघोष
जोपर्यंत मिळे तोष
सर्वांलागी ।।

-अनिरुद्ध रास्ते
(माझे मेहुणे रवी रामतीर्थकर यांनी माझ्यासाठी एक ओवी तयार केली. त्यावरुन सुचलेल्या ओळी)

रसनारंजक सगळे...


रसनारंजक सगळे, दूरदेशींचे आले
अजमावित त्यांची क्षमता, खिसे रिकामे झाले
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
मिरची, भाकर, कांदा, झुणक्याचे गोळा पिठले।।


शमविण्या येथली भूक, खाद्याच्या सरती राशी
नाव कमविण्या गर्दी, मास्टरशेफांची खाशी
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
कर्मयोगी ते बेडेकर, चितळे, जोशी।।

अनंत यंत्रे, तंत्रे, असती काम कराया,
किमया अनेक करुनी, आळविती प्रगतीकाव्या,
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
त्या जात्यावरल्या, ब्रह्मप्रहरीच्या ओव्या।।

वसुधा फिरुनी मजा करा, घ्या भरून खाद्यानंद
खाउनी कधी व्हा तृप्त नाहितर पिऊन व्हा बेधुंद
परि स्मरतील आणिक करतील व्याकुळ केव्हा
घास आईचा, चव पाण्याची, अन् आपल्या मातीचा गंध।।

-अनिरुद्ध रास्ते