Thursday, 27 July 2017

कृष्णबिंब

मनात वाकुन बघता मजला
दिसला बिंबित कान्हा ।
मलाच नकळत फुटला हृदयी
अपार प्रेमळ पान्हा ।।

पसरे अंतरी समाधान अन्
दुःखही सकल निमाले ।
श्यामकांतिची नीलमरंगत
पाहुन श्रमही पळाले ।।

गाई चरती गवत कोरडे
जणु विवेक षड्रिपु मारी ।
वरी निर्मिती दूध तयासम
सद्वृत्ती मनी पसरी ।।

संध्यासमयी सूर्य विसावे
केशर नभि या फुलवे ।
नील-केशरी विरोध साधुन
कृष्णरूप अति खुलवे ।।

आसमंत तो मनपटलाचा
'मीपण' राधा भावे ।
परमात्मा परि कृष्णरूपि हा
अहंगंड विरघळवे ।।
- अनिरुद्ध रास्ते

Monday, 24 July 2017

कविता: जरा हटके!


अशी दिसावी कविता सुंदर
मूर्तीमंत ती जणु अप्सरा ।
दोष नसावा कुठेच इतुका
कुठे नसावा किंचित नखरा।।

अशी दिसावी कविता सुंदर
रोज एकटी गच्चीवरती ।
वेळ अशीही जुळून यावी
कुणी नसावे अवतीभवती ।।

अशी दिसावी कविता सुंदर
मरुभूमीतिल निर्झर झुळझुळ ।
आसुसलेल्या नेत्रद्वयांची
सुसह्य करते थोडी तळमळ ।।

अशी दिसावी कविता सुंदर
सूर समेला जोडुन यावे ।
चुकार नजरेमधुनी बघता
हळुच तिनेही होय म्हणावे!!

- अनिरुद्ध रास्ते