Friday, 28 December 2018

जलपरी!

तरणांगणी त्या निळ्याशारश्या
लाट हळुहळू सरकत होती
संथगतीने पाण्यामधुनी
परी जलातिल पोहत होती।

कधि खाली कधि वरती जाउन
मासळिला ती हरवत होती
जलपटलावर रांगोळी जणु
लहरींची ती काढत होती।

शिक्षक होउन नेतृत्वाने
मार्ग नव्यांना दावत होती
पदके, गौरव, पुरस्कार अन्
मानमरातब मिळवत होती।

अखंड राहो यशमाला ही
उदंड गौरव असुदे भाळी
कर्मयोग जलपरी गीतेतिल
सुगम्य राहो सगळ्यांसाठी!

-अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 8 August 2018

का पितोस बाळा?

का पितोस बाळा, दुःख दाबण्यासाठी?
का पितोस बाळा, स्वप्न फुलविण्यासाठी?
विश्वास आतला, तुझा तुझ्यावर नाही?
की आधार मनाचा, तुझाच तुजला नाही?

मद्यप्राशनासाठी, कारण का लागावे?
स्वतःवरी मदिरेला, राज्य करु का द्यावे?
मलाही अनुभव आहे, हरवून कधी जाण्याचा
परंतु त्यापायी रे, नियंत्रण का हरवावे?

जल्लोष नसावा किंवा, नसो कुठे ओशाळा
सुरा सुरांची घेता, नको कोणता चाळा
ताब्यात तिच्या जाताही, ताब्यात तिला ठेवावे
दुःखांना अन् स्वप्नांना, स्वतःच सांभाळावे!

- अनिरुद्ध रास्ते

Saturday, 2 June 2018

पाऊस पहिला

आवरुनी सारंग आळवा,
मल्हाराची चीज।
घामाच्या धारांना पळवे
जलधारांची भीज।।

गुलमोहर अन् आंब्याचाही
रंग केशरी सरला।
श्यामलसुंदर आकाशी अन्
हरित धरेवर खुलला।

छत्री, टोप्या, काळे चष्मे
फेका माळ्यावरती।
पळा अंगणी, थेंब टपोरे
झेला अंगावरती।।

हात पसरुनी करूया स्वागत
सरसर सुरेल सरींचे ।
पाऊस पहिला मनीं साठवू
आशीर्वाद वरुणाचे।।

- अनिरुद्ध रास्ते

Sunday, 1 April 2018

कुणि मला हे सांगेल कां?

आईच्या पोटात अंधार गुडुप!
मायेची ऊब नि शांतता खूप
कुणि मला हे सांगेल कां? की
हे सगळं सोडून बाहेर का जायचं?

लपेटून दुपट्यात छान झोपायचं
दुडुदुडु धावत घर फिरायचं
कुणि मला हे सांगेल कां? की
हे सगळं सोडून शाळेत का जायचं?

शिक्षण घ्यायचं, प्रगल्भ व्हायचं
ज्ञान वाटून अजून वाढवायचं
कुणि मला हे सांगेल कां? की
लक्ष्मीसाठी शारदेला का नाडायचं?

मोठं व्हायचं नोकरी करायची
जनताजनार्दनाची सेवा करायची
पण कुणी मला हे सांगेल कां? की
यासाठी कुटुंबाची मनं का मोडायची?

मुलीला शिकवून मोठं करायचं
धडाक्यात भारी लग्न करायचं
पण कुणि मला हे सांगेल कां? की
तिला परक्याचं धन का म्हणायचं?

नातवंडांसंगे खेळ खेळायचे
म्हातारपण विसरून लहान व्हायचं
पण कुणि मला हे सांगेल कां? की
त्यांना संस्कृती कधी शिकवायची?

संसार करायचा, तृप्त व्हायचं
हळूच सगळ्यातून मुक्त व्हायचं
मग कुणि मला हे सांगेल कां? की
पुढच्या जन्मी परत का यायचं?

- अनिरुद्ध रास्ते

Thursday, 8 February 2018

मागे वळुनी पाहू नको...

समोर तारा बघत रहा रे
अंधाराला भिऊ नको
सतत पुढे तू जात रहा रे
मागे वळुनी पाहू नको।।

ध्येय आपुले गाठायाला
आळस काही करू नको ।
कष्ट कराया, भिंत चढाया
थोडा सुद्धा दमू गको ।।
एक उसासा टाक जरासा
परंतु झोपी जाऊ नको ।
सतत पुढे तू...

असेल गर्दी हितशत्रूंची
थोडी पेरण हितबंधूंची ।
विचलितबुद्धी होउ न देण्या
आजुबाजुला पाहु नको ।।
परंतु येता हात मदतिचा
झिडकारुन तू सोडु नको ।
सतत पुढे तू...

प्रतिकूल ते घडते म्हणुनी
तयारि करणे सोडू नको ।
संकट येता मार्गावरती
अंगण सोडून पळु नको ।।
घट्ट धरे तो तरतो ऐसा
मंत्र मात्र तू विसरु नको ।
सतत पुढे तू...

सत्कार्ये तू करता मनसा
कीर्ती मागे राही बरे ।
यशगाथा तव गाउन कितीदा
स्फूर्ती सकलां मिळे बरे ।।
उगाळण्या परि आत्मगंड तू
 क्षणभर सुद्धा थांबू नको ।
सतत पुढे तू...

- अनिरुद्ध रास्ते

Wednesday, 10 January 2018

रविबिंब कोवळे...

या विश्वाची बाग, असे विस्मयी फार
कैक चांदण्या वरती धरती मोहर अपार
यातील तरूवर वाटे फळ आंब्याचे आले
रविबिंब कोवळे दिन नवा घेउनी आले

मस्त उबेतुन जेव्हा, झोप मोडली किंचित
करता किलकिल डोळे चमके काही अवचित
कडक थंडिच्या रात्री जणु उष्मांकुर फुटले
रविबिंब कोवळे दिन नवा घेउनी आले

वसा घेतला स्वर्गी, दीपोत्सव करण्याचा
अष्टौप्रहरी उजळे नभमंडप सुंदर साचा
पुनवरातीला आधी चंद्रबिंब चमचमले अन्
रविबिंब कोवळे दिन नवा घेउनी आले

- अनिरुद्ध रास्ते