प्रिय आज्ञावलीस,
पत्र लिहीण्यास कारण की,..... तशी वेळ आली!
गेली १९ वर्षं मी तुला लिहीतोय, पण तुझ्याबद्दल पहिल्यांदाच! संसारात जशी बायको हळूच येते आणि सगळा कब्जा घेते, तशीच तू, आय्टीवाल्याच्या करीयरचा कब्जा घेणारी. कधीकधी बायको विसरायला लावून तुझाच विचार करायला लावणारी!
'तुझ्यासंगे संगणकाचं खेळणं करू' अशी गुर्मी असणार्या आयटोबाची ऐट हळूहळू उतरवून संगणकाच्या संगतीनं माझंच खेळणं करणारीही तूच! डेव्हलपर, टेकलीड, एक्सपर्ट, आर्किटेक्ट असे माझ्यातले बदल स्वतःही बदलून अनुभवणारीही तूच! आणि वेगवेगळे प्रोग्रॅम लिहीताना अनेक रूपांत तुला निर्माण करण्याच्या माझ्या परफॉर्मिंग आर्टची साक्षीदारही तूच!
कधी सह-कार्यचारिणी, कधी डोक्यात चढणारी दारू, आणि कायम माझ्या प्रगतीचा आलेख असणारी तू, एक रूप मात्र शेवटीच दाखवून जातेस. 'रिलीज' च्या वेळी कळतं, आता तुझ्यात बदल शक्य नाही! तुझं रुपांतर झालंय! आता तू आज्ञावली नाहीस, प्रोग्रॅम झालीयेस! मी शिकवल्याप्रमाणे संगणकाबरोबर सहजीवनासाठी तयार झालीयेस! आज तू पाठवणीला तयार झालेली पोर झालीयेस! शिकवायचं ते सगळं शिकवून झालं. यापुढे तुला शिकवता येणार नाही! तुझ्या तिथल्या वागण्यावरूनच लोक तुझी - आणि माझीसुद्धा - किंमत करणार आहेत! मुलीच्या बापाच्याही मनात असेच विचार येत असतील नाही? असा एक मुलीचा बाप होण्याचाही अनुभव देऊन जाणारी तूच!
असो! तुझ्याबद्दल लिहीताना तुला लिहायचंच विसरून गेलो. चल, आपल्याला प्रोग्रॅम बनवायचाय ना? मी सांगतो तसं कर! तुला ऐरणीवर ठेवून घण घातल्याशिवाय मला हवा तसा प्रोग्रॅम तयार होणार नाही. सवडीने पुन्हा कधीतरी सांगीन तुला, तुझ्याचबद्दल!
अनिरुद्ध.
No comments:
Post a Comment