Tuesday 5 September 2023

सर्दी!

शेंबूड ओघळे तो, कफही बराच झाला
येई घशास लाली, स्वर घोगराही झाला!
वाटे पुसून झाले, तरी धार वाहू लागे,
बाहीस नाक लागे, संपे रुमाल ओला!

घेऊन खूप काढे, जीभेस रंग काळा
चघळून कैक गोळ्या, लागे मुखास चाळा!
वाटे पडूपडूसे, घेऊन घोंगडीला
तरी घालमेल राही, वळता जरी कुशीला!

घेई कधी जराशी, घुटक्यात एक व्हिस्की
कधी अद्रकी चहाची, शमवून एक हुक्की
मात्रा कधी प्रभावी, घेऊन औषधांची
सर्दीस घालवूनी, सुटका मिळे कदाची!!

चालेल एकवेळ, कधी हाड मोडलेले
बोटास कापलेले, अडकून चेंबलेले!
पोटात आम्ल चाले, वा जाळ काळजाला,
परि सर्दीनाम शाप, लागू नये कुणाला!
परि सर्दीनाम शाप, लागू नये कुणाला!

- अनिरुद्ध रास्ते

Monday 26 June 2023

जहाज

दिसे एकले तारु तरंगे दूर सागरात
दुरून वाटे वहावले का खारप्रवाहात
हेलकावते लाटांवरती कधी वादळात
कधी सहज ते मार्गक्रमते निवांत वार्‍यात

भरून पोटी शिधा नि इंधन, व्यापारी चीजा
कप्तानासह खलाशी भरती उत्साह ताजा!
काय कोरले कपाळी माझ्या विचार ना शिवती
जहाजास त्या अथांग सागरी लोटुन ते देती

काय पाहिले कुणास ठाउक अशा जहाजाने
वादळवारे, उदय-अस्त, अन् आठवणी, स्वप्ने
समरे, चाचे, नवीन दुनिया, नवभूमी, खजिने
कधी खलाशी उन्मादित, कधी दिङ्मूढ मने!

आठवणींचा, अनुभवांचा घेऊन संभार
जात राहते एकटेच ते पुढे हळूवार
गंतव्याचे ठिकाण येता शांत उभे राही
काय पाहिले, काय भोगले, दिसू न ते देई

काय शिकावे अशा जहाजाकडून आपण हो?
पचवून मागील सारे, जीवन पुढे जात राहो!

-अनिरुद्ध रास्ते

Tuesday 4 April 2023

मसालापुरी

पाणीपुरीभक्षण पूर्ण होता,
तोंडी चवींचा कल्लोळ असता,
घसा, नाक, जीभेवरी जाळ वाटे
तरी एक खाऊ अशी आस दाटे!

अशावेळी येई मग शांतिकन्या
मोहातुनी या मज सोडविण्या
हळू जात जिव्हासनी बैसते ती
'कुरुम्' नादिता पावती चित्तवृत्ती!

अशा खाद्यकर्मास नित्ये करावे
पाचापुरीयज्ञ त्यासी म्हणावे
पुजा लाभते जैसी फलश्रुतीने
पा.पु.ही लाभे मसालापुरीने!!!

-अनिरुद्ध रास्ते

Sunday 5 March 2023

कॉफी!

होऊन कडू अन् काळा
मी कपात पडलो होतो।
गरम त्यात डोक्याने
धुमसत आतुन होतो।।

येऊन तुझ्या स्निग्धाने
कशी कशिदाकारी केली।
रूपावर माझ्या आता
मी स्वतःच भाळत होतो!

जरि वरी पांढरा फेस
तरि आतुन धगधग क्लेश।
साखर तवहास्याची
मी हळूच झेलत होतो!

ढवळुनी कराने माया
निवविशी अपुले द्वैत
ओठांनी आता माझ्या
मी मलाच चुंबत होतो!

-अनिरुद्ध रास्ते

Friday 20 January 2023

लाट

लाट येई पायी माझ्या
वाळूवर फुटतसे।
जाई परत निवांत
मला ओढू बघतसे!

ओढ सोडवत नाही
जातो कंबरखोलात।
धप्पा देई पाठीवर
जल्लोष एकक्षणात!

उसळत फेसाळत
येई एकामागे एक।
कधी आवाज गंभीर
कधी हेलावते मूक!

कधी एकटीच येई
कधी जोडीसाखळीने।
घेरु पाही चारी दीशा
पळतो मी शिताफीने!

अशी मैत्रीण ती माझी
लाट समुद्राची पोर।
खेळ खेळू युगे युगे
नाही आनंदाला पार!

- अनिरुद्ध रास्ते

Sunday 7 August 2022

जाळे मनिचे

अथांग निळ्यावर 
अर्धी पसरली पाने,
शंभरीतल्या पन्नाशीचा
आलेख काढला त्याने!

विणले वाटे 
विचारजाळे मनिचे
उरले कितितरी
अजून अनुभवण्याचे।

अल्याड जाळिच्या, 
भौतिक विश्व जे जगले
पल्याड राहिले, 
अनंत किती बघण्याचे।

या जाळ्यातच 
अडकला जिवाचा मासा
तुटेल जेव्हा, 
तो क्षण मुक्तिचा खासा!

-अनिरूद्ध रास्ते

Monday 20 June 2022

पन्नाशी आली!

दुसर्‍या सत्राची तरुणाई आली
पुनर्जन्माची जणु नांदीच झाली
अनुभव, उत्साह घेऊन आली,
आली आली आली पन्नाशी आली!

युवाही नाही नि वृद्धही नाही,
उच्छृंखल नाही नि शिथिल नाही,
संयमासह शक्तीला घेऊन आली
आली आली आली पन्नाशी आली!

कुठे केसांना पांढरी किनार
कुठे नजरेला चाळीशी आधार
सुटलेली पोटं पट्यानी बांधली
आली आली आली पन्नाशी आली!

तूतूमैमै आता सोडून देऊ
मिळाले जे त्याचा आनंद घेऊ
हौसेने जगण्याची वेळ ही आली
आली आली आली पन्नाशी आली!

- अनिरुद्ध रास्ते